Wednesday, July 10, 2019

बोला इंग्रजी शिका मराठीतून

बोला इंग्रजी शिका मराठीतूनइंग्रजी शिकवणा-या पुस्तकांची ज्ञानगंगा दुथडी भरून वहात असताना हा पुस्तक रुपी छोटासा ओहोळ आम्हाला का बरे त्यात जोडावासा वाटला?

काय भूमिका आहे आमची?

त्याचं काही विशेष कारण आहे.

बाजारात तुफान विक्री होणारी काही फास्ट किंवा “रेपिडली” शिकविण्याचा दावा करणारी पुस्तकं आम्ही चाळली, वाचली, अभ्यासली.

आणि माझ्यातील सकारात्मक माणूस प्रचंड अस्वस्थ झाला.

त्या पुस्तकांमुळं कोणी कदाचित इंग्रजी बोलायला शिकलही असेल, पण त्यातून मिळणारं आयुष्याच ज्ञान मात्र अत्यंत नकारात्मक आहे.

त्या लेखकांची उदाहरणे अत्यंत नकारात्मक आहेत. अपघात, बाजारातील मंदी इत्यादींची ते चर्चा करतात. मला तर असं वाटलं की हे लेखक आयुष्याला कंटाळलेले आहेत. आयुष्यात हरलेले आहेत. टोपल्या टाकायच्या अशा पद्धतीनं त्यानी पुस्तकं लिहून टाकलेली आहेत. त्यामुळ वाचणाराला आनंद वाटत नाहीय. आतून प्रेरणा दाटून येत नाहीय.

अनेकांनी सांगितलं, की सर, पुस्तक तर घेतलं पण दहा पानं वाचता वाचता इतका कंटाळा आला, की आता कोणत्या फडताळात पुस्तक ठेवलयं तेही आठवत नाहीय.
  
ही “रेपिडली” शिकविण्याचा दावा करणारी पुस्तकं अत्यंत रसहीन आहेत. त्यामुळं ही सुद्धा पाचवीच्या भूगोल गणिता सारखी निर्जीव टेक्स्ट बुकं वाटू लागतात.

या पुस्तकांची नकारात्मक बाब म्हणजे सर्वात आधी ही गुरू माणसे चमत्कारीकपणे व्याकरण शिकविण्याचा प्रयत्न करतात. ग्यानबाची मेख इथेच आहे.

आठवा बरं तुम्ही माय मराठी कशी शिकलात? तुमच्या आईनं सर्वात आधी तुम्हाला व्याकरण शिकवलं होतं का हो?

मुळीच नाही!

सगळ्यात आधी आपण शब्द आणि व्यक्ति किंवा वस्तु यांचा संबंध लावायला शिकलो. उदाहरणार्थ आपण सर्वात आधी 'आई' बोलायला शिकलो. आई हा एक मानवी भावना दर्शक आवाज  (साउंड इफेक्ट) आहे.
  
नंतर आपण कारांत शब्द शिकलो. जसे की बाबा, मामा, दादा, काका ई. तद्ननतर आपण पाणी, भात, भाजी इत्यादी बोलायला शिकलो.

गम्मत म्हणजे तेंव्हा आमची स्वत:ची अलग डिक्शनरी होती. अलग शब्द संग्रह होता. आम्ही पाण्याला पाणी नव्हे तर, ता ता ता... किंवा ना ना ना... किंवा असच काहीतरी बोलायचो. तेंव्हा काय आम्हाला व्याकरणाचे धडे दिले जात होते?

नाही!

तद्नंतर आम्हाला प्रशिक्षण मिळालं घरातील वस्तुंना ओळखण्याचे. मग आजू बाजू च्या वस्तू ,मग आम्ही शाळेत गेलो, मग व्यवहार्य भाषा शिकलो मग कुठे जाउन व्याकरण!

आता इंग्रजी शिकविणारा बहाद्दर मास्तर नेमकं याच्या उलटं करतो. सगळ्यात आधी हे शिक्षक व्याकरण नामक तलवार हातात घेतात. आणि बाजी प्रभू च्या आवेशात खिंड लढवतात की बाप म्हणून तुम्ही इंग्रजी स्पिकिंगच्या प्रांतात शिरलात तर खबरदार...
.
जर तुम्ही इंग्रजी बोलताना चुकलात तर त्यांच्या चेह-यावर एक कुत्सित छद्मी पुसटसं हसू फुटतं. ते हसू तुमच्या सूक्ष्म नजरेतून सुटत नाही. अन इंग्रजी संभाषणा विषयीची तुमची इच्छा शक्ती मरू लागते.
   
मानवी समाजाच्या एकंदर भाषिक आदान प्रदानाचा आम्ही सखोल अभ्यास केला तेंव्हा आमच्या हाती काही मूल्यवान सूत्रे लागली. कोणताही माणूस रोजच्या आयुष्यात किती शब्द वापरत असतो?
  
निश्चितच तुम्हाला याचं आश्चर्य वाटेल की आपण चाळीस पंचेचाळीस वाक्यच पुन्हा पुन्हा व्यावहारीक जीवनात वापरतो. त्यातील नाम केवळ बदलत रहातं. आणिक ही वाक्य बनवण्यासाठी किती शब्दांची गरज असते? जास्तीत जास्त दीड दोनशे... बस!

तर काय याचा अर्थ असा मानावा की चाळीसेक वाक्य शिकलात तर तुम्ही इंग्रजी बोलू शकाल? उत्तर आहे... होय!

पण बाबांनों कृपया ते व्याकरणाचे खूळ डोक्यातून काढून टाका बरें.

अजून एक रहस्य तुम्हाला सांगतो, भारतीय भाषा सर्वार्थाने समृद्ध आहेत. आपण जसे बोलतो तसेच लिहितो. आपल्या कडे पुष्कळ शब्द आहेत.

इंग्रजी भाषा लिहिली जाते वेगळी अन बोलली जाते वेगळीच. एकच प्रकारचे उच्चार असलेले त्यांच्याकडे अनेक शब्द असतात. वानगी दाखल शब्द घ्या राईट फेअर प्रिंसिपल विक असे असंख्य.
लिहिताना व्याकरणाचा विचार जरूर करा परंतु तो नियम बोलताना लागू पडत नाही.

म्हणून इंगजांना बोलताना पाहीलत तर कम्युनीकेशनसाठी शब्दां बरोबर ते खांदे उडवतात, हात हलवतात किंवा चेह-याच्या स्नायुंचा अन हावभावांचा जास्त वापर करतात.

(पाहीलतं जसां इंग्रज हा शब्द वाचला की कित्येकांच्या मनात कुठेतरी दूर वर एक पुसटशी नकारात्मक भावना उमटली. असो.)   

थोडक्यात सांगू का, अहो तुम्ही जगातील सर्वात कठीण भाषेला जिभेवर घेऊन आहात. ती म्हणजे मराठी.  

तर जगातील सर्वात सोपी भाषा, इंग्रजी.

मग ही सोपी भाषा तुम्हाला बोलायला येणार नाही का? सहज यईल.

जो मनुष्य वाघिणीला माणसाळवू शकतो तो मांजरीला देखील माणसळावू शकतो. फक्त एक मानसीक अवरोध आहे त्यावर विजय प्राप्त करणं आवश्यक आहे.

यालाच मी ‘‘व्याकरण फोबिया’’ अशा नावानं सम्बोधतो.

“फोबिया” ही एक मानस शास्त्रीय संज्ञा आहे. त्याला आपण म्हणूया काल्पनीक भीती किंवा दुर्भीती

हा 'व्याकरण फोबिया' कुठून येतो त्याचा आम्ही हजारो लोकांच्या मुलाखती घेऊन धाण्डोळा घेतला.

पाचवी सातवीला प्रथमत: आमचा इंग्रजी भाषेशी सम्पर्क आला. तो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजां पासून ते महात्मा गांधीजीं पर्यंत ढोबळ इतिहास आम्हाला पढवला गेला. त्यात आमच्या चिमुकल्या मेंदूवर संस्कार झाले ते जाज्वल्य देश प्रेमाचे. ज्यात आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध कसे लढलो याच्या शौर्य गाथा आमच्या मनावर बिम्बून राहिल्या.

मनातल्या मनात कित्येकदा आम्ही मावळे होऊन किंवा मिठाच्या सत्याग्रहात सामील होऊन इंग्रजांशी लढलो देखील.

अन अचानक त्यांचीच भाषा दत्त म्हणून, आमची तारणहार म्हणून, पुढे येउन उभी रहाते, की बेट्या आता तुझी सुटका माझ्यावाचून होणे नाही.

इतिहासाचा तास संपला की इंग्रजीचे सर येऊन सांगू लागतात, “इंग्रजीस पर्याय नाही हो.”

ज्या लोकांच्या विषयी तिरस्कार भरला गेला.. जो पुढे पाचवी ते दहावी पर्यंत क्रमा क्रमाने वाढतच जातो.. त्याच लोकांच्या भाषेस शिकावे लागते हा अंतर्विरोधाभास चिमुकल्या मनात तयार होतो.

एकी कडे इंग्रजी सत्तेविषयी नकारात्मक मन तयार होत असताना दुसरी कडे त्यांची भाषिक गुलामगिरी स्वीकारायला शिक्षण व्यवस्था सांगते हा विरोधाभास अनेक मुलांना अस्वस्थ करून टाकत असतो.  

इंग्रजीचा तास सम्पला की आमचा मराठीचा तास सुरू होतो त्यात मातृभाषेतून शिक्षण झालेच पाहीजे असे धडे दिले जातात. कविता शिकवली जाते..विलायती वेशांतील भुंकतात कुत्री.. 

अन आमच्या चिमुकल्या मेंदूत या सर्व ज्ञानाचं दही किंवा भेसळ होऊ लागते. आमचे शिक्षण तज्ज्ञ यातून कसा मार्ग काढतील कुणास ठाऊक. पण नुकसान मात्र आमच्या अनेक पिढ्यांचं होतय एवढं निश्चित.
(मी बापडा केवळ विश्लेषण करतोय हं.)

दुसरं असं की इंग्रजीत कच्च्या असलेल्या; आम्ही, चुकीचे शब्द उच्चारले की सम्पूर्ण वर्ग आमच्यावर खसखसून हसायचा. मास्तरां पासून ते वर्ग मित्रां पर्यंत सर्वांनीच आमची खिल्ली उडवली. म्हणून आमच्या अंतर्मनात इंग्रजी बोलण्याची भीती घर करून राहिली.

अगदी त्या डॉक्टरच्या सुई प्रमाणे.

डॉक्टरची (इंजेक्शनची) सुई किती वेदना निर्माण करते हो? अगदी दोन तीन मुंगळे डसल्या इतकीच. पण तरीही मोठी मोठी माणसे त्याला घाबरतात. प्रचण्ड घाबरतात.

काय इतकासा दर्द सहन करण्याची ताकद आम्हां मध्ये नसते? असते ना. अहो पाय फ्रेक्चर झाला जखमी झालो तरीही लंगडत लंगडत आम्ही डॉक्टरच्या डिस्पेंसरीत पोहचतो. पण डॉक्टरने इंजेक्शन काढताच आम्ही ओरडू लागतो. कारण...

जेव्हा आम्ही लहान होतो तेंव्हा आम्ही खूप हट्ट करायचो. तेंव्हा आमची आजी म्हणायची, थांब, येउ दे डॉक्टरला तो तुला इंजेक्शन देईल मग तुला खूप दुखेल. मग आम्ही म्हणायचो, नको नको मला इंजेक्शन नको. मी नाही हट्ट करत’.

ते आजी चं वाक्य आमच्या अंतर्मनावर कोरलं जातं, कायमचच.

अगदी त्याच पद्धतीनं त्याच दरवाज्यानं आमच्या मनात ब्रम्हराक्षस घुसला ग्रामर - फोबिया नावानं.

त्यात आमची शिक्षण पद्धती.. काही बोलायलाच नको. इतक्या विचित्र अनं चुकीच्या पद्धतीनं आजही ग्रामीण भागात (काही शहरी भागातही) अध्ययन अन अध्यापन होतं आहे.

तुम्ही म्हणाल, समजलं सारं ! आता उपाय योजना तरी सांगा.
                
होय, त्याचीच तर आपण चर्चा करतोय.

आपण पुन्हा एकदा मानवी भाषिक विकासाच्या क्रमाकडे वळू या. निसर्गत: आपण भाषा शिकू या. आपण मराठी बोलायला शिकलो दीड वर्षांचे होतो तेंव्हा. मग नऊ दहा वर्ष आपण बोलतच राहीलो. लिहत राहीलो. अन असं करत असताना असंख्य वेळा चुकत राहिलो

आपण बोलणार आहोत, अगदी चूक असेल तरीही बोलू. थेट लहान मुला सारखं.
आत्मविश्वास वाढविण्या करितां आपण घरातूनच सुरुवात करू या.

घरात आपण तीन चार वाक्यच पुन्हा पुन्हा बोलत असतो.  

उदा. माझा मोबाईल कुठे आहे?

मग मोबाइल नंतर पेन, रुमाल, घड्याळ, पैसे, चप्पल, चावी इत्यादी काहीही आपण विचारतो. तर इथे मोबाइल हे नाम आहे. आणि वस्तुंचे नाम (प्रॉपर नाउन) कोणत्याही भाषेत तेच असतं. बदलत नाही.

आता यालाच इंग्रजीत बोलून दाखवा,

वेयर इज माय मोबाइल? (आता गम्मत सुरू होईल)

वेयर इज़ माय पेन’?

वेयर इज माय वॉच’?

वेयर इज माय की’?

या वाक्यांतून वेयर इज तसच राहीलं. फक्त वस्तुंची नावं बदलली.

खूपच सोपं आहे.

असं बोलताना चुकून तुम्ही म्हणालात, वेयर इज माय शूज” तर आई किंवा पत्नि शूज कुठे आहेत ते सांगणार नाही का? सांगेलच!

परंतु सनातन व्याकरण अनुसार तुम्ही विचारवयांस हवे होते,  वेयर आर माय शूज’…
पण मजेची गोष्ट सांगतो मित्रांनो अहो आपण भारतीय लोकं, शुद्ध इंग्रजी बोलतच नाही. आपण बहुधा भाषांतरित इंग्रजी बोलतो.

परंतु त्याचा बाऊ न करता भाषा हे एक संवादाचं माध्यम आहे हे ही आपण लक्षात घेतो.

घरी आलेल्या पाहुण्यांना आपण विचारतो, चहा पिणार का ?’ हेच आम्ही इंगजीत विचारू, डू यू ड्रिंक टी?’ हे व्याकरणाच्या दृष्टी कोनातून चूक आहे.इथे विचारवयास हवे आहे, “वुड यू लाइक टू हॅव सम टी

आता दुसरं मजेदार उदाहरण घेऊ यात.. पाऊस पडतोय” याला आपण कसं म्हणू?.. रेन इज फॉलिंग’.. परंतु हे चूक आहे. इथं हवय, “इट्स रेनिंग”

पण जरी आम्ही व्याकरणदृष्ट्या चूक बोललो तरीही पाऊस पडणार नाही काय?

तुम्ही काय बोलताय हे समोरच्याला समजले नाही काय? ... कम्युनिकेशन जरूरीचं आहे. घाबरू नका.

व्याकरणाचे महारथी दबा धरून बसले आहेत, तुम्हाला घाबरवायला. ते तुमच्या मनात इंग्रजी बोलण्या विषयी भीती निर्माण करतील. सावधान!

मी कमिशनर लेवलच्या क्लास वन अधिका-यांना  “ग्रामर फोबियानं” ग्रस्त झालेलं पाहिलय . ते वाचू शकतात लिहू शकतात पण दोन शब्द इंग्रजीतून बोलायचे तर त्यांना घाम फुटतो.

आमच्या मानवी भाषिक संशोधनात आम्हाला हेही आढळले की कोणत्याही भाषेस मुळात व्याकरण नसतेच.   (जपानी पुस्तक : हाऊ लेंग्वेजेस, राईज-फॉल मधून साभार)
आजही ग्रामीण विभागात जी स्थानिक मराठी भाषा बोलली जात आहे त्यात शिव्याही आहेत. उलट सुलट शब्द (ज्याना म्हणी म्हणतात) ते ही आहेत.

त्या स्थानिक भाषेस आम्ही शहर निवासी कदाचित खालच्या स्तराची म्हणून पहात असू.

भाषा ही कम्युनिकेशन चे केवळ माध्यम आहे. पाहू या व्याकरणाच्या नियमांचे पालन नाही केले तर काय होईल?

समजा तुम्ही बोललात, “वेयर इज माय चश्मा”? तर काय हे चुकीचं वाक्य आहे? मुळीच नाही!

अरे माझ्या लाडक्यांनो, आमच्या व्यावहारीक मराठी भाषेत तुम्ही (सम्पूर्ण समाज) साठ टक्के इंग्रजी शब्द घुसवलेले आहेत तर इंग्रजी बोलताना आमचे मातृभाषिक शब्द आले तर काय मोठ पाप झाल?
अ जी बा त  ना ही!

परंतु स्वयम घोषित इंग्रजीचे पण्डित तुमच्यावर हसतील. कदाचित त्या नंतर तुम्ही कधीही  इंग्रजी बोलण्याचा प्रयत्नही करणार नाही.

पण आपण एका कम्प्यूटर युगाचे साक्षीदार आहोत जिथे इंग्रजी बोलणे, अनिवार्य आहे. संपूर्ण मानव जातीचं संगणकीकरण होत आहे. संपूर्ण विश्व छोटं होत आहे. कम्युनिकेशनची  साधनं जबरदस्त गतीनं उन्नत होत आहेत.

मागच्या पन्नास वर्षात मानवीय मेंदू अचानक उन्नत झाला आहे. मानव समाज अन अनेक विचारधारांच्या आपल्या संकुचित कोषांतून बाहेर पडत आहे.

त्यामुळच सम्पूर्ण विश्वात एक विचित्र घटना घडत आहे, की सम्पूर्ण मानव समूह एकाच भाषेत बोलण्याचा प्रयत्न करू लागला आहे. हा एक नैसर्गिक प्राकृतिक चमत्कार आहे.

सगळ्या जगातील कावळे कांव-कांव करतात. मांजरी म्याव म्याव करतात. सर्व जगातील प्राणी त्यांच्या त्यांच्या प्रजाती मधील भाषा उच्चारण, संदेश यंत्रणा तंत्र समजतातच.

त्यांची भाषा वैश्विक असते.

उदाहरणार्थ भारत देशातील मांजरे अमेरिकेत घेउन गेलो तरीही अमेरिकेतील मांजरे भारतीय मांजरांची भाषा सहज समजू शकतात.

त्यांच्या कम्युनिकेशन मधे काहीही फरक पडत नाही.
केवळ मानवी समाज एक अशी प्रजाति आहे, ज्यानी भौगोलिक परिस्थिती अनुसार भाषा निर्माण केल्या आहेत.

इथपर्यंत तर ठीक होत पण प्रांत वादाच्या आक्रमण कर्त्यांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्या करिता भाषा हे ही माध्यम बनवलं. माझी भाषा श्रेष्ठ तुझी भाषा कनिष्ठ, असा भेदभाव निर्माण केला. परंतु आता एक विशाल बदलाव येतोय.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की जगभरातून जवळपास सहा हजार पेक्षा जास्त (बोली) भाषा नष्ट झाल्या आहेत.

उदाहरण घ्यायचेच झाले तर मोडी, मागधी, इजिप्शियन भाषा, आदिवासींच्या अनेक भाषा, भटक्या समाजाच्या भाषा, 'बोली' संस्कृत इत्यादि.
भारत देशातील प्रमुख प्रमाण भाषा या दोन भागात विभागल्या आहेत. 

नागरी आणि ग्रामीण. यातील ग्रामीण भाषा हळू हळू नागरी भाषेत विलीन होत आहे. आणि नागरी भाषा इंग्रजी मधे विलीन होत आहे.

गेल्या वीस वर्षात आमच्या महानगरातील शालेय शिक्षणात एक विशेष परिवर्तन आलेले आहे.
  
प्रत्येक विद्यार्थाचे शिकण्याचे माध्यम, इंग्रजी होत आहे. हा बदल इतका जबरदस्त आहे की
आताच्या घडीला अठरा वर्षाच्या आतील पीढ़ी आपली आपली मातृभाषा बोलू शकते पण लिहू शकत नाही.

आपली मातृभाषा लिहीणारी आमची (चाळीशीतील माणसे,) शेवटची पीढी आहे.  
येणा-या शम्भर वर्षात आमची मातृभाषा लुप्त होइल.

आणि इंग्रजी भाषा सम्पूर्ण विश्व भर पसरलेली असेल.

परंतु या विश्लेषणा नंतर आम्हाला विचलीत होण्याची आवश्यकता नाहीय.

कारण आम्ही सर्व या बदलाचे साक्षीदार आहोत. तुम्ही दहावी बारावी पर्यंत शिकलेले असाल तर हा मुद्दा तुम्हाला लगेचच समजेल.

आम्हाला पाठ्यपुस्तकात पसायदान पासून ते चि. वी. पर्यंत अन पु. ल. पासून ते तरूण (क्रांतिकारी?) लेखकां पर्यंत धडे होते.

त्यावर नजर मारली तर लक्षात येतं की आमच्या मातृभाषेनं किती परिवर्तनं पाहिली आहेत.
इतकच नव्हे, शाळेतील क्रमिक भाषा आणि आमची बोली भाषा यात किती फरक झालेला आहे.

हा एक नैसर्गिक बदल आहे. पॉलीटिकल (राजकीय असा शब्द मी टाळला आहे ते सूज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच) नेते याला पश्चिमी आक्रमण म्हणतात.

पण माझ्यासारखा समाजशास्त्र संशोधक, याला मानव समाज उत्थानाची एक प्रक्रिया असं समजतो.

आपण आज शर्ट पॅंट घालतो. कुठे आहे आमचे धोतर आणि बण्डी? हे पश्चिमी आक्रमण नसून मानव समाजाचे परिवर्तन आहे.
यातून कमीत कमी इतकं चांगलं झालं की कपड्यावरून निर्माण होणारा आमचा भेदभाव आम्ही विसरून गेलोय.

रोज सकाळी उठून आपण चहा पितोच की नाही? बटाट्याचे पदार्थ खातोच की नाही? टी.वी. पहातेच की नाही?

हे सर्व पश्चिमी देशांतून आलं पण जे चांगलं ते स्वीकारणं ही सहज  मानवी प्रवृत्ति आहे.

हे सामाजिक विश्लेषण इथं देण्याचं काही विशेष कारण आहे.

जर इंग्रजी भाषा शिकण्याबद्द्ल काही पूर्व ग्रह मनात असतील अथवा अंतर्मनात दडलेले असतील तर ते या निमित्तानं बाहेर यावेत.

जर तुमच्या कुटुंबातून किंवा मित्र मंडळींकडून इंग्रजी बोलण्यास विरोध होत असेल अथवा आमची खिल्ली उडवली जात असेल तर तुम्ही कितीही पुस्तकं वाचलीत तरीही तुम्हास इंग्रजी बोलावयास यावयाचे नाही.

कारण कोणतीही भाषा बोलणे हा एक 'सामाजिक सामूहिक' प्रयास असतो.

जिथं तुम्ही राहता त्या लोकांनी तुमच्या प्रयत्नांना वाखाणले नाही, किंवा आम्ही दुस-यांच्या प्रयत्नांना समजून घेतले नाही तर इंग्रजी बोलणे हे तुमचं निव्वळ स्वप्न बनून राहील.

तीच भाषा तुम्ही बोलता जी जास्तित जास्त वाचता ऐकता. सबब इंग्रजी बातम्या पहाणे, ऐकणे, जे  आवडेल ते इंग्रजी वाचणे. (अगदी कॉमिक्स सुद्धा चालतील.) अगत्याचे आहे.
इंग्रजी  सिनेमा पहाणे हा ही एक चांगला अभ्यास असू शकतो.जुन्या विचारांची लोक इंग्रजी सिनेमा वाईट समजतात

पण जेम्स बॉन्ड, रॉकी, रैंबो सारखे सिनेमा, जैकी चेनचे सिनेमा खरोखरीच चांगले आहेत.

या उलट  काही नवीन हिंदी सिनेमा कुटुंबा सोबत पहाण्या लायकही नसतात. स्पोकन इंग्रजी ची सीडी एकणे हा ही एक चांगला अभ्यास आहे.

तुम्हाला इंग्रजी समजते, वाचता येते परंतु बोलण्यासाठी मानसीक अवरोध आहे म्हणून चूक की बरोबर याची चिंता ना करता बोलत रहा बोलत रहा.

जीवनात यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टींची नितांत आवश्यकता आहे,

पहिली आहे प्रॅक्टिस

दूसरी आहे प्रॅक्टिस आणि

तीसरी आहे प्रॅक्टिस।

प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट!

No comments:

Post a Comment

1

Subscribe Us

Recent-post

Labels

Blog Archive

Facebook